वलांडी | प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील वलांडी येथे मोहरम सण यंदाही मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. मुस्लिम दिनदर्शिकेनुसार दहाव्या मोहरमनिमित्त शुक्रवारी (दि. २६ जून) पारंपरिक सवाऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.
यावेळी मौलाली, इमामे कासीम, बडे नालसाब, छोटे नालसाब आणि हुसेन बाशा या पारंपरिक सवाऱ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. शतकानुशतके जपल्या गेलेल्या परंपरेनुसार सहाव्या मोहरमला रात्री २ वाजता आणि नवव्या दिवशी दुपारी २ वाजता मौलाली सवारी उठविण्यात आली.
इमामे कासीम ही पारंपरिक व प्रतिष्ठित सवारी तब्बल नऊ वर्षांनंतर सातव्या दिवशी रात्री ३ वाजता उठविण्यात आली. ‘भंगे अलावा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सवारीला ऐतिहासिक महत्त्व असून ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली. तसेच आठव्या व दहाव्या दिवशी बडे नालसाब आणि छोटे नालसाब यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. हुसेन बाशा यांची सवारी नवव्या दिवशी पहाटे ५ वाजता आणि दहाव्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात निघाली. सुमारे ३० ते ४० मानकरी रिंगण करून ही सवारी गावभर फिरविण्यात आली. येशीजवळ श्रीफळ अर्पण करून विविध सवाऱ्यांना भेट देत धार्मिक विधी पार पाडण्यात आले.
दहाव्या मोहरम दिवशी बडे नालसाब सवारीबाबत भाविकांमध्ये विशेष श्रद्धा दिसून आली. सवारीच्या मार्गात महिला, पुरुष तसेच लहान बालकांना सवारीचा स्पर्श (तुडवणे) झाल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी या सवारीसाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतात.
मोहरम निमित्त गावात भाविकांची मोठी गर्दी
मोहरम उत्सवानिमित्त वलांडीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, लातूर, उदगीर तसेच परिसरातील अनेक गावांमधून ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गाव श्रद्धा, भक्ती आणि बंधुभावाच्या वातावरणाने भारावून गेले होते. भाविकांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी दुधाचे सरबत वाटप करण्यात आले.
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि मोहरम उत्सव समिती यांच्या समन्वयामुळे संपूर्ण मोहरम उत्सव शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
























