वलांडी | प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील महादेववाडी येथे शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या व त्यांची तीन पिल्ले जागीच ठार झाली. तसेच एका वासरावर हल्ला करून त्याचे पोट फाडल्याने ते गंभीर जखमी झाले.
महादेववाडी येथील शेतकरी अंकुश हणमंत गूजे यांच्या शेतात बांधलेल्या शेळ्यांवर या हिंस्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन शेळ्या आणि तीन पिल्लांचा मृत्यू झाला, तर एका वासराला गंभीर दुखापत झाली.
याच परिसरातील बोंबळी शिवारात शेतकरी शामराव शिंदे यांच्या शेतात बांधलेल्या पारडूवरही हिंस्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात पारड्याचे कान, पोट आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
या सलग हल्ल्यांमुळे महादेववाडी व बोंबळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जनावरांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून नुकसानीची नोंद घेतली. तसेच संबंधित हिंस्र प्राण्याचा मागोवा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात दोन सीसीटीव्ही (ट्रॅप) कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असे वनविभागाने सांगितले.
दरम्यान, संबंधित हिंस्र प्राण्याचा शोध लागेपर्यंत महादेववाडी व बोंबळी शिवारातील शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी आणि कोणताही संशयास्पद प्रकार अथवा हिंस्र प्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
























