वलांडी | प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची प्रक्रिया पूर्ण होऊन आज निकाल जाहीर करण्यात आले. देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले.
वलांडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या मतांमुळे काँग्रेसला फटका बसत भाजपच्या उमेदवार उषाताई संभाजी पाटील यांनी विजय मिळवला.
उषाताई पाटील यांना ७,३५९, काँग्रेसच्या उमेदवार अंजली बेळकोणे यांना ६,६९५, तर वंचित बहुजन आघाडीच्या मनिषा गायकवाड यांना ९६३ मते मिळाली. भाजपच्या उमेदवार पाटील उषाबाई ६६४ मतांनी विजय झाले.
जवळगा जिल्हा परिषद गटात भाजपचे रामलिंग शेरे यांना ७,२२५ मते मिळाली, तर काँग्रेसचे विकास डगवाले यांना ५,६७१ मते मिळाली. रामलिंग शेरे हे १,५५४ मतांनी विजयी झाले.
बोरोळ जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे औदुंबर पांचाळ यांना ६,७१४ मते मिळाली, तर भाजपचे धोंडराज गुणाले यांना ६,६९१ मते मिळाली. औदुंबर पांचाळ हे अवघ्या २३ मतांनी विजयी झाले.
वलांडी पंचायत समिती गणात भाजपचे बाळासाहेब पाटील यांना ३,५२३, काँग्रेसचे उमेश बिरादार यांना २,६५१, तर वंचित बहुजन आघाडीचे यासीन मूंजेवार यांना १,२६३ मते मिळाली. बाळासाहेब पाटील हे ८७२ मतांनी विजयी झाले.
विळेगाव गणात काँग्रेसचे सगर नागनाथ यांना ४,२४४, तर भाजपचे विजयकुमार बोराळे यांना ३,४४२ मते मिळाली. सगर नागनाथ हे ८०२ मतांनी विजयी झाले.
जवळगा गणात भाजपच्या महादेवी पाटोळे यांना ४,०२५, तर काँग्रेसच्या सुरेखा सोनकांबळे यांना २,५८२ मते मिळाली. महादेवी पाटोळे या १,४४३ मतांनी विजयी झाल्या.
दवणहिप्परगा गणात भाजपच्या अंकिता पाटील यांना ३,८५५, तर काँग्रेसच्या प्रभावती पाटील यांना २,९९३ मते मिळाली. अंकिता पाटील या ८६२ मतांनी विजयी झाल्या.
बोरोळ गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गजानन बिरादार यांना ३,८९३, तर भाजपचे प्रमोद पाटील यांना २,१९९ मते मिळाली. गजानन बिरादार हे १,६९४ मतांनी विजयी झाले.
तळेगाव गणात भाजपच्या अश्विनी हंचनाळे यांना ३,३१९, तर काँग्रेसच्या प्रणिता चामले यांना ३,१३४ मते मिळाली. अश्विनी हंचनाळे या १८५ मतांनी विजयी झाल्या.
निकालानंतर भाजपच्या वलांडी जिल्हा परिषद गटाच्या विजयी उमेदवार उषाबाई पाटील यांनी विजयी मिरवणूक काढून मतदारांचे आभार मानले.
























