मांजरा काठावर कमळ फूलणार?
प्रतिनिधी/वलांडी
तालुक्यातील जवळगा येथे शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित प्रचार सभेत माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. गेल्या वीस वर्षांत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सत्ताधारी पक्षांनी केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा मांडत त्यांनी जनतेसमोर वास्तव चित्र उभे केले.
विरोधी पक्षांनी सत्तेत राहून तब्बल ७० वर्षांत केलेल्या विकासकामांच्या तुलनेत भाजपाच्या १७ वर्षांच्या कार्यकाळात विकासाची गती कितीतरी पटीने वाढल्याचा दावा करत त्यांनी आकडेवारीसह मुद्दे मांडले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा न करता काही नेते केवळ भावनिक विषय पुढे करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यावर टीका करत निलंगेकर म्हणाले, “विकासाच्या प्रश्नांना बगल देऊन भावनिक मुद्द्यांच्या आधारे मते मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा खोट्या प्रचारामुळेच मतदार आज अधिक जागरूक झाले आहेत.”
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांना प्रत्युत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, “लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा निर्णय हा केवळ घोषणा नसून, शासनाने बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज देण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच या योजनेचा लाभ निश्चित दिला जाणार आहे.”
येत्या ७ तारखेला देवणी तालुक्यासह वलांडी गट व गणातील सुज्ञ मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतपणे कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सभेनंतर जवळगा परिसरात जागोजागी बसलेल्या ज्येष्ठ मतदारांमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विकासाभिमुख भाषणाची चर्चा रंगताना दिसून आली. “एकच ध्यास – विकासाचा कौल” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांतून उमटत आहे.
आमचा उमेदवार आमच्यातलाच असावा…
बाहेरून येणाऱ्या उमेदवारांपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येणारा उमेदवार हा गावातील प्रश्नांना जवळून जाणणारा, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा असावा, असे मत नागरिकांनी मांडले.
“राजकीय समीकरणांपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा असून, आमच्यातून उभा राहिलेला उमेदवारच आमचा खरा आवाज ठरू शकतो,” अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, मांजरा काठावर तसेच वलांडी परिसरातही कमळाचीच चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात असल्याने येथे मतविभाजन होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
























