प्रतिनिधी/ वलांडी
तालुक्यातील वलांडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असले, तरी रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी थेट घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एमआयएमच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावातील मुख्य रस्त्यावर नाली नसल्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून त्यामुळे गावभर दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व गल्ल्यांतील सांडपाणी मुख्य रस्त्यावर जमा होत असल्याने त्या गल्ल्यांमध्ये ये-जा करताना नागरिकांना साचलेल्या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच भागात मुस्लिम बांधवांची मस्जिद असून, पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाल्यामुळे नमाजासाठी ये-जा करताना भाविकांना या घाण पाण्यातून जावे लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मुख्य रस्त्यावरील नालीचे काम त्वरित हाती घ्यावे व नागरिकांची मागणी पूर्ण करावी, अन्यथा येत्या वीस दिवसांत सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही एमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर एमआयएमचे सिराज बौडीवाले, बाबूलाल पठाण, मजरोद्दीन बौडीवाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
























