प्रतिनिधी / वलांडी
देवणी तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेत देवणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या दोन तासांत पीडित मुलीचा शोध लावून तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ५ मार्च २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२६ अन्वये भा.दं.सं. कलम १३७ (२) व बीएनएसएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तातडीने तपास पथक नेमण्यात आले.
तपास पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर देवणी पोलिसांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली. अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित मुलीस ताब्यात घेतले.
यानंतर देवणी पोलिसांचे तपास अधिकारी आर. जी. लामतुरे यांनी अक्कलकोट येथे जाऊन पीडित मुलीस ताब्यात घेत देवणी येथे आणले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ही कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोलीस हवालदार आर. जी. लामतुरे, गोपे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
























