वलांडी | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत देवणी तालुक्यातील वलांडी येथे गूरूवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
बंदच्या पार्श्वभूमीवर निषेध रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर चौकातून शांततेत रॅली काढण्यात आली. रॅली मुख्य चौकात आल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत महसूल विभागाचे तलाठी सागावे यांच्यामार्फत देवणी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.
निवेदनात नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जची निष्पक्ष व सखोल चौकशी करून जखमी विद्यार्थ्यांना तसेच मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत, वैद्यकीय सहाय्य व पुनर्वसन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय पंजाबमधील शेतकरी आंदोलनादरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पात्र लाभार्थ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच भविष्यात नीट, टीईटी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका गळतीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, डिजिटल सुरक्षायंत्रणा, पारदर्शक परीक्षा प्रणाली आणि कठोर कायदेशीर यंत्रणा लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील, मोहन केंद्रे व पवन गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अविनाश गायकवाड, अहमद सौदागर, मुकेश कांबळे, धनराज बनसोडे, काँग्रेसचे कार्यकर्ते विलास वाघमारे, रहीम शेख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
























